भारतीय संस्कृती जपणारा, सा-यांनाच आपलासा वाटणारा मुंबई युनिव्हर्सिटीचा ४० वा ‘युथ फेस्टिवल’ लवकरच आपल्या भेटीला येतो आहे.
मल्हार, उमंग.. ऑगस्ट महिना येतो तोच फेस्टिवल घेऊन, पण या इंग्रजाळलेल्या उत्सवांच्या गर्दीत आजही आपली संस्कृती जपणारा, सा-यांनाच आपलासा वाटणारा मुंबई युनिव्हर्सिटीचा ४० वा युथ फेस्टिवलही लवकरच आपल्या भेटीला येतो आहे.
रुईया, रूपारेलपासून पार अगदी कोकणापर्यंत सा-या महाविद्यालयांनी तयारीचा नारळ तर केव्हाच फोडला आहे. रजिस्ट्रेशनची प्रक्रियासुद्धा पार पडली. ‘ऑगस्टपासून त्या-त्या विभागाच्या केंद्रावर पात्रता फे-या होतील आणि मग चर्चगेटच्या ‘क्लब हाऊस’ (विद्यार्थी कल्याण मंडळ)ला अंतिम फेरीदरम्यान वाङ्मयीन स्पर्धेमध्ये वक्तृत्व, वादविवाद, कथा लेखन, कविता लेखन, प्रश्नावली, नाटय़ विभागात एकांकिका,माईम, स्किट, एकपात्री नाटय़ाभिनय, नृत्य विभागात लोकनृत्य, क्लासिकल डान्स, क्रिएटिव्ह डान्स, फाइन आर्ट्समध्ये पोस्टर मेकिंग, ऑन द स्पॉट पेण्टिंग, क्ले मॉडलिंग, कोलाज आणि संगीतमध्ये समूहगान, फोक आर्केस्ट्रा, इनस्ट्रमेंटल,क्लासिकल निरनिराळय़ा स्पर्धा आहेत आणि या सर्वामध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई युनिव्हर्सिटीचे स्टेट आणि नॅशनल लेव्हलवर प्रतिनिधित्व करायची संधी मिळणार आहे. शिवाय सर्वात अधिक बक्षिसे मिळवणा-या महाविद्यालयाला करंडकसुद्धा.
म्हणूनच गेल्या वर्षीचे विजेते रुईयाएट्स, उपविजेते पोद्दार महाविद्यालय, विजेतेपदाची हुलकावणी मिळालेले मिठीबाई, एन. एम., साठय़े महाविद्यालय या नावाजलेल्या अनुभवी महाविद्यालयांबरोबरच सीकेटी (चांगू काना ठाकूर महाविद्यालय,पनवेल)सारखे गेल्या युथ फेस्टिवलमध्ये आपली छाप पाडणारे महाविद्यालय वा नालंदा कॉलेज, गोखले कॉलेजसारखी नवीन कॉलेजेस या तुमच्या-आमच्या सा-यांच्या, आपल्याशा वाटणा-या युथ फेस्टिवलच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहेत, तर चला मग टिपीकल युथ फेस्टिवलच्या स्टाईलने म्हणा,गणपती बाऽऽप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयागणपती बाऽऽप्पा मोरयाउंदीर मामा की जय.

No comments:
Post a Comment