युथ फेस्टिवलमध्ये सर्वाधिक गर्दी खेचणारा इव्हेंट म्हणजे एकांकिका. एखाद्या ग्रुपसोबत चिअर अप करण्यासाठी मोठ्ठा क्राऊड तर एखाद्या ग्रुपकडे सेट सामग्रीसुद्धा मोजकीच. वेगवेगळ्या संकल्पना, प्रयोग, कधी सरळधोपट मार्ग तर कधी नाविन्यासाठी रिस्क.. सारं काही एकांकिकांच्या निमित्ताने अनुभवायला मिळालं.
युथ फेस्टिवलमध्ये सर्वाधिक गर्दी खेचणारा इव्हेंट म्हणजे एकांकिका. एखाद्या ग्रुपसोबत चिअर अप करण्यासाठी मोठ्ठा क्राऊड तर एखाद्या ग्रुपकडे सेट सामग्रीसुद्धा मोजकीच. वेगवेगळ्या संकल्पना, प्रयोग, कधी सरळधोपट मार्ग तर कधी नाविन्यासाठी रिस्क.. सारं काही एकांकिकांच्या निमित्ताने अनुभवायला मिळालं.
२३ आणि २४ सप्टेंबरला विद्यापीठाच्या शाहीर अमरशेख सभागृहात तब्बल एकोणीस मराठी एकांकिका सादर झाल्या. पाटकर-वर्दे महाविद्यालयाच्या गिरीश सावंत दिग्दर्शित ‘उडूनी चालली रात’ या एकांकिकेने सर्वोत्कृष्ट स्त्री अभिनेत्रीसह (वैशाली चव्हाण) सर्वोत्कृष्ट एकांकिकेचं पारितोषिक पटकावलं. यात वडील आणि मुलीच्या नात्यातील विविध रंग दिग्दर्शकाने कल्पकतेने सादर केले आहेत. वडीलांच्या निधनानंतरची मुलीची अवस्था दाखवणारा एकांकिकेचा शेवट हृदयद्रावक आहे. समर्पक संगीताने हे भाव अधिक गहिरे केले आहेत. या शेवटानेच एकांकिकेच्या यशावरही शिक्कामोर्तब केलं.
देवेंद्र पेम लिखित, विनोद गायकर दिग्दर्शित ‘लक्ष्मीनारायणाचा जोडा’ या जे. एस. एम. महाविद्यालयाच्या एकांकिकेने द्वितीय पारितोषिक पटकावले. यात नवरा-बायकोच्या नात्यातील गंमत दाखवली आहे. तर धर्माच्या नावाखाली समाजात फूट पाडणा-यांच्या विरोधात त्यांच्याच धार्माच्या अनुयायाने पाऊल उचलल्याची कथा सांगणा-या ‘ब्रेन वॉश’ या व्हिव्हा कॉलेजच्या एकांकिकेला आणि सी.एच.एम. महाविद्यालयाच्या ‘लेजंडस् ऑफ हिस्ट्री’ या एकांकिकेला तिसरे पारितोषिक विभागून देण्यात आले.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये ओमकार राऊत (रुपारेल) प्रथम, रणजित घरत (जे.एस.एस.) द्वितीय, स्वप्नील इंगळे(एम.डी.)तृतीय, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये वैशाली चव्हाण (पाटकर) प्रथम, श्रद्धा पोखरणकर (जे.एस.एम.)द्वितीय,दर्शना मोहिते(पाटकर-वर्दे) तृतीय यांना गौरवण्यात आले.
अर्जुन व चित्रांगदेची कथा बंगाली लोककलेच्या माध्यमातून सांगणारी भालचंद्र कुबल लिखित व प्रमोद शेलार दिग्दर्शित‘चित्रगंदा’ व रुपारेलची ‘नाव ठेवायला जागा नाही’या एकांकिकांना उत्तम सादरीकरण आणि नाट्यभिनय असूनही केवळ स्तुतीवर समाधान मानावे लागले. पराग बेडेकर, शकुंतला नरे आणि उमेश नामजोशी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
२४ सप्टेंबर रोजी रात्री पाटकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा जल्लोष, आनंद, विजयोत्सव अजुनही ताजा होताच की त्यात आणखी एका विजयश्रीची माळ २६ तारखेला त्यांच्या गळळ्यात पडली. एकांकिकेच्या विश्वात गोरेगावच्या पाटकर वर्दे महाविद्यालयाचे निर्विवाद वर्चसव सिद्ध झाले.
ग्रूप (बी)अर्थात अन्य भाषिक एकांकिका स्पर्धेत हिंदी आय. एन. टी.त सर्वोत्कृष्ट ठरलेल्या ‘स्टँड बाय मी’या इंग्रजी एकांकिकेला प्रथम क्रमांकाने गौरवण्यात आलं. तरुणांच्या नातेसंबंधांवर तरल भाष्य करणारी ही एकांकिका सुमित तांबे यांनी लिहिली असून आशिष मोरेने दिग्दर्शित केली आहे. मिठीबाईच्या ‘रबडी’या एकांकिकेला द्वितीय पारितोषिक मिळालं तर रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘दर्या के उस पार’ या एकांकिकेने तृतीय पारितोषिक मिळवलं. या एकांकिकेत वर्तमानाची मिश्किल शैलीतून दखल घेण्यात आली आहे. अभिनेते राजन पाटील, डॉ. मंगेश बनसोडे आणि सुलभा मंत्री हे स्पध्रेचे परीक्षक होते. संहितेपेक्षा सादरीकरणावर अधिक भर दिल्याचं परीक्षकांनी सांगितलं.
व्हिव्हा कॉलेजची ‘शिकार’ही बक्षिसपात्र न ठरल्यामुळे व्हिवाईटस्मध्ये नाराजी होती. प्रवीण तरडे लिखित ‘आर्टीफिशल इंटेलिजन्स’ही आजच्या तरुणांचा प्रॅक्टिकल अॅटिट्यूड आणि त्यांची जिद्द यांच्यावर भाष्य करणारी व शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी एकांकिका मर्यादीत वेळेआधीच संपल्यामुळे सी.के.टी. पनवेलच्या बक्षिसाच्या आशा पुन्हा एकदा मावळल्या. रुपारेलच्या वाट्यालाही निराशाच आली. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे प्रथम व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक ‘गोगटे-जोगळेकर’च्या योगेश कुंभार आणि ओंकार पाटीलने मिळवले तर पाटकरच्या नकुल पाटीलला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. काहींची पहिलीच वेळ आणि मिळालेले यश, तर काहींचे शेवटचे वर्ष. प्रत्येकाची वेगळी कथा आणि व्यथा या स्पर्धेनिमित्त अनुभवायला मिळते. काहींचे अश्रू अनावर होत असतात. तर काहींच्या आनंदाला उधाण आलेलं असतं. या भावभावनांच्या सप्तरंगी इंद्रधनुष्याच्या आठवणी पाठीमागे ठेवून ‘डोन्ट लूज होप इज’ हे ‘मॉरल ऑफ द स्टोरी’ शिकवत एकांकिका स्पर्धाची सांगता झाली. पुन्हा एकदा नव्या जोमाने ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबरला होणाऱ्या स्किट, माइम, मोनो अॅक्टिंगची तयारी करायला सारीच महाविद्यालये सज्ज झाली आहेत.
