विरह ...........
एकच सांग मला तुला अधिकार कोणी दिला
दुःख हेच माझ्या मनीचे की तू असा सोडुनी गेलास !!
ते सोनियाचे दिन त्या मंदधुंद राती
जणू सदा चांदण्यांचा सारा , आला माझ्या हाती
फुलांसोबत असंख्य काटे माझ्या ओंजळीत टाकुन गेलास
माझ्या संसाराचा डाव अर्ध्यावरच मोडून गेलास !
एकच सांग मला तुला अधिकार कोणी दिला
दुःख हेच माझ्या मनीचे की तू असा सोडुनी गेलास !!
नको ती पदकं ते सन्मान अन ती प्रसिद्धि
परतुनी फ़क्त ये तू तुला एवढीच विनंती
स्वप्नं दाखवुनी सप्तरंगी तू दृष्टिच घेवुनी गेलास
जन्माआधीच माझ्या बाळाचा बाबा घेवुनी गेलास !
एकच सांग मला तुला अधिकार कोणी दिला
दुःख हेच माझ्या मनीचे की तू असा सोडुनी गेलास !!
अरे असशील तू महान असशील तू मोठा
या भारतामातेचा बड़ा हिंमतवान बेटा
पण माझ्यालेखी तू एक पळपुटा पति च ठरलास
आणाभाका शपथा वचने सारी विछ्छिन्ना करुनी गेलास !
एकच सांग मला तुला अधिकार कोणी दिला
दुःख हेच माझ्या मनीचे की तू असा सोडुनी गेलास !!
मी सुद्धा ठरवलय , आता आणखी अश्रु नाही ढाळनार
तुला पाठी परतुनी कधीच नाही मी आठवणार
मात्र एक वीरपत्नी म्हणुन मोठ्या तोरयात मिरवणार
पण ...........
पण हे वेडं मनं हे माझे मागे परतुनी पाहे
तुझ्या विरहाचे दुःख माझ्या ह्र्दयातुनी वाहे
देवूनी प्राणांची आहुति तू तर सरयांचा आदर्श बनलास
मी एक वीरपत्नी की कमनशिबी विधवा
प्रश्न अंतरीचा माझ्या अखेर अनुत्तरितच राहिला !
एकच सांग मला तुला अधिकार कोणी दिला
दुःख हेच माझ्या मनीचे की तू असा सोडुनी गेलास !!
- सोनाली नाईक.

No comments:
Post a Comment