Tuesday, August 17, 2010

गेट रेडी फॉर कॉलेज

दहावीच्या निकालानंतर महाविद्यालयीन जीवनाची आतुरतेने वाट बघणारे अनेक विद्यार्थी लवकरच महाविद्यालयीन आयुष्याची सुरुवात करणार आहेत. सुरुवातीला धडधडत्या अंत:करणाने कॉलेजच्या आवारात पाऊल टाकल्यावर कॉलेजच्या रंगात असे काही रंगून जातील की पुढची पाच वर्ष कधी सरून जातील हे कळणारच नाही.

एकीकडे टीवाय आणि मास्टर्सची परीक्षा देऊन महाविद्यालय जीवनाच्या आठवणींची शिदोरी घेऊन अनेकांनी आपल्या कॉलेज लाइफचा निरोप घेतला असेल तर दुसरीकडे दहावीच्या निकालानंतर महाविद्यालयात सरसावलेले,महाविद्यालयीन जीवनाची आतुरतेने वाट बघणारे अनेक विद्यार्थी लवकरच महाविद्यालयीन आयुष्याची सुरुवात करणार आहेत.

आईच्या मायेने प्रत्येक गोष्ट खाऊच्या घासाप्रमाणे मुखाशी आणून देणा-या शाळेची साथ सुटली, याची हूरहूर जरी मनात उठत असली तरी दुसरीकडे ताई, दादांकडून आजपर्यंत ऐकलेल्या कॉलेजच्या गमती-जमती, ती सगळी धम्माल, मजामस्ती प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार असल्याने एक प्रकारची एक्साइटमेंट नवख्या कॉलेजवीरांच्या मनात आहे. लेक्चर बंकिंग,कॅन्टीनमधली धमाल, कॉलेजमधून मूव्हीला जाणं, आजपर्यंत हे सारं काही फक्तऐकलं होतं. शिवाय यापुढे युनिफॉर्म नसणार मग दरवर्षीसारखे दोन युनिफॉर्म खरेदी करण्याची गरज नाही. रोज नवीन नवीन कपडे घालून मिरवायला मिळणार म्हणून मुलांची जरी चंगळ असली तरी पालकांच्या खिशाला दरवर्षीच्या तुलनेने यंदा जास्त फोडणी बसणार आहे, यात काही शंका नाही. कारण दोन किंवा तीन जीन्स अथवा ट्राऊझर्स, त्यावर सूट होणारे टी-शर्ट्स, कृर्ती, त्याला मॅचिंग किंवा शोभेल असे सॅन्डल्स, बॅग्स अशा वेगवेगळ्या शॉपिंगसाठी त्यांना पैसे द्यावे लागणार आहेत.

शालेय जीवन संपलं की जीवाभावाचे अनेक मित्रमैत्रिणी विभिन्न क्षेत्रात करिअर करण्याच्या इच्छेपोटी वेगवेगळय़ा वाटा पकडतात. त्यामुळे आजपर्यंत ज्यांच्या बरोबरीने शैक्षणिक क्षेत्रात वाटचाल करत होतो त्यांची साथ सुटल्यावर पुढचा प्रवास एकटय़ानेच करायचा आहे, ही आठवणसुद्धा मनात विचारांचं वादळ उठवते. अनोळखी वातावरण, अनोळखी जग, त्यात सगळा वेगळा अभ्यास.. या सा-या वातावरणात आपलं कसं होणार? हा प्रश्न अधून मनात काहूर माजवत असतो. त्यामुळे थोडासा का होईना पण एक प्रकारचा नव्‍‌र्हस अ‍ॅटॅक आलेला असतो.

बट फ्रेंड्स, नॉट टु वरी, धडधडत्या अंत:करणाने कॉलेज आवारात पाऊल टाकणारे तुम्ही या कॉलेजच्या रंगात असे काही रंगून जाल की पुढची पाच र्वष कधी सरून जातील हे कळणारच नाही. कदाचित अल्पावधीतच जीवाभावाच्या, आपल्याच विचारांच्या कितीतरी मित्र-मैत्रिणी मिळतील. नाटय़मंडळ, वाङ्मय मंडळात रमून जाताना हळूहळू शालेय जीवनातील आठवणी हृदयाच्या एका कोप-यात बंदिस्त होतील आणि मग जेव्हा टीवायचं वर्ष येईल तेव्हा कॉलेज जीवन संपणार ही कल्पनाच करवणार नाही.

पण दिल्ली अभी बोहोत दूर है। सो गाईज, बी बिनधास्त, कॉलेज लाइफ एन्जॉय करायला तयार व्हा. अर्थात एन्जॉयमेंटच्या नावाखाली आपण काहीतरी अयोग्य किंवा अवैध तर करत नाही ना, याची खात्रीही करून घ्या. वाईट व्यसनं आणि प्रलोभनं यापासून दूर राहा आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास. तो महत्त्वाचाच आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तोही थोडाफार कराच.. काय, पण टेन्शन घेऊ नका..

सो जस्ट गेट, सेट, गो फॉर कॉलेज.

No comments:

Post a Comment