Monday, September 28, 2009

माझ्या कविता ..............

विरह ...........

एकच सांग मला तुला अधिकार कोणी दिला

दुःख हेच माझ्या मनीचे की तू असा सोडुनी गेलास !!

ते सोनियाचे दिन त्या मंदधुंद राती

जणू सदा चांदण्यांचा सारा , आला माझ्या हाती

फुलांसोबत असंख्य काटे माझ्या ओंजळीत टाकुन गेलास

माझ्या संसाराचा डाव अर्ध्यावरच मोडून गेलास !

एकच सांग मला तुला अधिकार कोणी दिला

दुःख हेच माझ्या मनीचे की तू असा सोडुनी गेलास !!

नको ती पदकं ते सन्मान अन ती प्रसिद्धि

परतुनी फ़क्त ये तू तुला एवढीच विनंती

स्वप्नं दाखवुनी सप्तरंगी तू दृष्टिच घेवुनी गेलास

जन्माआधीच माझ्या बाळाचा बाबा घेवुनी गेलास !

एकच सांग मला तुला अधिकार कोणी दिला

दुःख हेच माझ्या मनीचे की तू असा सोडुनी गेलास !!

अरे असशील तू महान असशील तू मोठा

या भारतामातेचा बड़ा हिंमतवान बेटा

पण माझ्यालेखी तू एक पळपुटा पति च ठरलास

आणाभाका शपथा वचने सारी विछ्छिन्ना करुनी गेलास !

एकच सांग मला तुला अधिकार कोणी दिला

दुःख हेच माझ्या मनीचे की तू असा सोडुनी गेलास !!

मी सुद्धा ठरवलय , आता आणखी अश्रु नाही ढाळनार

तुला पाठी परतुनी कधीच नाही मी आठवणार

मात्र एक वीरपत्नी म्हणुन मोठ्या तोरयात मिरवणार

पण ...........

पण हे वेडं मनं हे माझे मागे परतुनी पाहे

तुझ्या विरहाचे दुःख माझ्या ह्र्दयातुनी वाहे

देवूनी प्राणांची आहुति तू तर सरयांचा आदर्श बनलास

मी एक वीरपत्नी की कमनशिबी विधवा

प्रश्न अंतरीचा माझ्या अखेर अनुत्तरितच राहिला !

एकच सांग मला तुला अधिकार कोणी दिला

दुःख हेच माझ्या मनीचे की तू असा सोडुनी गेलास !!

- सोनाली नाईक.

Monday, September 14, 2009

My college days...............

http://www.youtube.com/watch?v=IIagdnbvM3I

आयएनटी... लवकरच...........


कॉलेज फेस्टिवलच्या तयारीची लगबग सुरू असतानाच जवळ जवळ सा-या कॉलेजेसचं लक्ष आयएनटीच्या एकांकिका स्पर्धेकडे लागलेलं असतं. ही एकांकिका स्पर्धा, त्याचा निकाल आणि निकालानंतर टिपिकल नाटकवाल्यांचा स्टाईलमध्ये होणारा निषेध, परीक्षक आणि संयोजकांशी रंगणारा वादविवाद असा पुरेपूर मसाला या स्पर्धेच्या निमित्ताने अनुभवायला मिळतो. मागच्या वर्षी गाडाकरून झालेला राडा तर सर्वश्रुत आहेच.

पण या वेळी ही स्पर्धा काहीशा वेगळय़ा स्वरूपात होणार आहे. ७ सप्टेंबरपासून सुरू होणारी ही स्पर्धा नेहमीप्रमाणे पात्रता,उपांत्य व अंतिम अशा तीन फे-यांची न ठेवता दोन फे-यांची करण्यात आलेली आहे. अर्थात, प्राथमिक फेरी ही नेहमीप्रमाणे तालिम स्वरूपात असेल आणि या फेरीमधून अंतिम फेरीसाठी १५ एकांकिका निवडण्यात येतील आणि ही अंतिम फेरी तीन दिवस चालेल. त्यापैकी प्राथमिक फेरी ७ ते १२ सप्टेंबर आणि अंतिम फेरी १६ ते १८ सप्टेंबर या कालावधीत दुपारी दीड ते साडेआठ या वेळेत होईल.

यंदा आयोजकांनी स्पर्धेमध्ये केलेला आणखी एक स्वागतार्ह बदल म्हणजे प्राथमिक फेरीतून बाद झालेल्या एकांकिकांमधूनसुद्धा तीन उत्कृष्ट एकांकिका आणि अभियनाची पारितोषिकं देण्यात येतील.

एचएमएम, पुन्हा एकदा रंगदेवता आणि नाटय़रसिकांना विनम्र अभिवादन करत आयएनटीची एकांकिका स्पर्धा नक्कीच रंगणार.. सो बी रेडी पुन्हा एकदा आयएनटीच्या जल्लोषात सामील होण्यासाठी आयएनटी.. जस्ट कमिंग सून...

Wednesday, August 19, 2009

युथ फेस्टिवलचा बिगुल... 05 August, 2009 08:00:00 AM सोनाली नाईक, नालंदा लॉ कॉलेज.

भारतीय संस्कृती जपणारा, सा-यांनाच आपलासा वाटणारा मुंबई युनिव्हर्सिटीचा ४० वा ‘युथ फेस्टिवल’ लवकरच आपल्या भेटीला येतो आहे.

मल्हार, उमंग.. ऑगस्ट महिना येतो तोच फेस्टिवल घेऊन, पण या इंग्रजाळलेल्या उत्सवांच्या गर्दीत आजही आपली संस्कृती जपणारा, सा-यांनाच आपलासा वाटणारा मुंबई युनिव्हर्सिटीचा ४० वा युथ फेस्टिवलही लवकरच आपल्या भेटीला येतो आहे.

रुईया, रूपारेलपासून पार अगदी कोकणापर्यंत सा-या महाविद्यालयांनी तयारीचा नारळ तर केव्हाच फोडला आहे. रजिस्ट्रेशनची प्रक्रियासुद्धा पार पडली. ऑगस्टपासून त्या-त्या विभागाच्या केंद्रावर पात्रता फे-या होतील आणि मग चर्चगेटच्या क्लब हाऊस’ (विद्यार्थी कल्याण मंडळ)ला अंतिम फेरीदरम्यान वाङ्मयीन स्पर्धेमध्ये वक्तृत्व, वादविवाद, कथा लेखन, कविता लेखन, प्रश्नावली, नाटय़ विभागात एकांकिका,माईम, स्किट, एकपात्री नाटय़ाभिनय, नृत्य विभागात लोकनृत्य, क्लासिकल डान्स, क्रिएटिव्ह डान्स, फाइन आर्ट्समध्ये पोस्टर मेकिंग, ऑन द स्पॉट पेण्टिंग, क्ले मॉडलिंग, कोलाज आणि संगीतमध्ये समूहगान, फोक आर्केस्ट्रा, इनस्ट्रमेंटल,क्लासिकल निरनिराळय़ा स्पर्धा आहेत आणि या सर्वामध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई युनिव्हर्सिटीचे स्टेट आणि नॅशनल लेव्हलवर प्रतिनिधित्व करायची संधी मिळणार आहे. शिवाय सर्वात अधिक बक्षिसे मिळवणा-या महाविद्यालयाला करंडकसुद्धा.

म्हणूनच गेल्या वर्षीचे विजेते रुईयाएट्स, उपविजेते पोद्दार महाविद्यालय, विजेतेपदाची हुलकावणी मिळालेले मिठीबाई, एन. एम., साठय़े महाविद्यालय या नावाजलेल्या अनुभवी महाविद्यालयांबरोबरच सीकेटी (चांगू काना ठाकूर महाविद्यालय,पनवेल)सारखे गेल्या युथ फेस्टिवलमध्ये आपली छाप पाडणारे महाविद्यालय वा नालंदा कॉलेज, गोखले कॉलेजसारखी नवीन कॉलेजेस या तुमच्या-आमच्या सा-यांच्या, आपल्याशा वाटणा-या युथ फेस्टिवलच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहेत, तर चला मग टिपीकल युथ फेस्टिवलच्या स्टाईलने म्हणा,गणपती बाऽऽप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयागणपती बाऽऽप्पा मोरयाउंदीर मामा की जय.